महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना युतीत येण्याची खुली ऑफर दिली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. या ऑफरनंतर लगेचच उद्धव दिल्लीला रवाना होत असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान उद्धव यांचा दिल्ली दौरा संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने आहे. काँग्रेस पक्षाने 19 जुलै रोजी ही बैठक बोलावली असून त्यात ‘इंडिया’ आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असल्याने ती राष्ट्रीय स्तरावर एकत्रितपणे प्रश्न मांडण्यासाठी आवश्यक असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्ष सध्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. संसदेत सरकारला घेरण्यासाठी आणि सामान्य मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या बैठकीत सोनिया गांधींची उपस्थिती विरोधकांमध्ये एकतेचा संदेश देईल, अशी अपेक्षा आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांचा एक समान अजेंडा असावा, ज्यामुळे संसदेत सरकारला कोंडीत पकडता येईल, अशी काँग्रेसची रणनीती आहे. केवळ घोषणाबाजी किंवा निषेध न करता मुद्देसूद चर्चा करून सरकारला जबाबदार धरण्याचे त्यांचे ध्येय आहे.