राज्यात कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करुन कुटुंबीय आपल्या घरी निघाले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
नाशिकच्या दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अल्टो कार रस्त्याशेजारील नाल्यात पलटली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सर्व जणांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक mh 04 dy 6642 व एका मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नाल्यामध्ये पलटी झाली. या अपघातात आल्टो गाडीमधील सात जणांचा मृत्यू झाला.
तर मोटर सायकलवरील तरुण मंगेश यशवंत कुरघडे, अजय जगन्नाथ गोंद जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. यातील अल्टो गाडीतील मृतांचे नातेवाईकाचे मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते. ते परत त्यांचे गावी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाली होती. यात गाडी लॉक झाली होती. त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेले. तर बुडून सात जणांचा मृत्यू झाला.