- ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत यांनी आज मराठीजनांची एकजूट, शिंदे-शहा दिल्ली भेट आणि ठाकरेंच्या युतीवर भाष्य केले आहे.
- दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी लोकांमध्ये हा आत्मविश्वास निर्माण झाला असला तरी, महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे नाही. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ही युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले आहे, ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील, असा दावा राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे.
- मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल, याची भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना वाटत आहे.
- शिंदे आणि फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात आणि राज त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे. फडणवीस हे राज यांना भेटून राजकीय हवा गरम करतात. शिंदे यांची हवा सध्या संपल्यानेच त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत आणि या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही. एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, आता राज ठाकरे स्वतः…
