दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये काल एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका वडिलांनी राज्य पातळीवर खेळणाऱ्या टेनिसपटू मुलीला गोळ्या झाडून ठार केले. राधिका यादव असे या टेनिसपटूचे नाव होते . राधिकाने राज्य पातळीवर अनेक विजेतेपदे पटकावली होती. पण, तिच्या वडिलांनी राधिकावर एकामागोमाग पाच गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांच्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेल्या राधिकाला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
ही घटना काल दुपारी सेक्टर 57 येथील निवासस्थानी घडली. राधिका तिच्या कुटुंबासोबत तिथे राहत होती. आरोपी वडिलांनी राधिकावर एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना अटक केली असून घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्वरही जप्त केले आहे.
पोलीस प्रवक्ते संदीप यांच्या माहितीनुसार, सेक्टर-57 सुशांत लोक फेज-2 मध्ये राहणारे दीपक यादव प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांची 25 वर्षांची मुलगी राधिका यादव टेनिसपटू होती. गेल्या काही दिवसांपासून राधिकाने परिसरात एक टेनिस कोचिंग अकादमी सुरू केली होती. यामध्ये अनेक तरुण-तरुणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही अकादमी बंद करण्यासाठी दीपक आपली मुलगी राधिकावर दबाव आणत होता, परंतु राधिका नकार देत होती. राधिका टेनिस अकादमी चालवण्यावरुन गावकऱ्यांनी टोमणे मारल्यामुळे दीपक यादव त्रस्त झाला होता. याशिवाय राधिकाचे काही रील्स, म्युझिक व्हिडिओही दीपकसाठी डोकेदुखी ठरत होती. आज दोघांमध्ये इतका वाद झाला की, दीपकने रागाच्या भरात राधिकावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या तिच्या कमरेला लागल्या.