ब्रेकिंग! फेंगल चक्रीवादळाचा तडाखा, राज्यात थंडीचा जोर कमी होणार

तमिळनाडू व आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. तर तब्बल ताशी ८० ते ९० किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहू लागले होते. हे वादळ किनारपट्टी ओलांडण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य बंगालमधील फेंगल चक्रीवादळ गेल्या सहा तासात ताशी १० किमी वेगाने पश्चिम-नैऋत्य दिशेकडे सरकले असून रात्री ९.३० वाजता बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्येला, उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ आणि महाबलीपुरमच्या नैऋत्येला आणि चेन्नईच्या वायव्येला ३० किमी अंतरावर केंद्रीत झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह काही जिल्ह्यांत कमी उंचीवरील ढग दिसतील. त्यामुळे या ठिकाणी हलका पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी मात्र थंडी कमी होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.