अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘बिग बॉस 13’मध्ये तिच्यासोबत स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री आणि खास मैत्रीण रश्मी देसाई तिला अखेरचा निरोप द्यायला अंत्यसंस्काराला पोहोचली होती. परंतु शेफालीच्या निधनाच्या चार दिवसांतच रश्मीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम अशा कॅज्युअल लूकमध्ये रश्मीने हे फोटोशूट केले आहे. यामध्ये ती हसत-हसत आणि काही ग्लॅमरस पोजसुद्धा देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने लिहिले, दोनच दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या निधनाचे दु:ख आणि आता हे सर्व फोटो? शेफाली काय विचार करेल? सगळा दिखावा आहे तुम्हा लोकांचा. तर दुसऱ्याने म्हटले आहे , थोडा तरी विचार करायला हवा होता. मैत्रिणीच्या निधनाला चार दिवस झाले नाहीत आणि इथे असे फोटो पोस्ट करतेय, तुला लाज वाटली पाहिजे, अशीही टीका काहींनी केली आहे.