ब्रेकिंग! पाकची पुन्हा वाकडी चाल, पण…

Admin
2 Min Read
  • भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराच्या अचूक आणि जोरदार कारवाईनंतर आता लढाई केवळ सीमित राहिलेली नाही, तर ती थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून भारताने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईनंतर भारताचे लक्ष आता जागतिक राजकारणाच्या पटावर केंद्रित झाले आहे आणि तिथेच सुरु झाला आहे ‘डिप्लोमॅटिक स्ट्राईक’चा पुढचा टप्पा.
  • दहशतवादाविरोधातील लढाईला आता भारत सरकारने एक नवी धार दिली आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ची खरी माहिती आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरातील महत्त्वाच्या राष्ट्रांमध्ये पाठवली जातील.
  • या शिष्टमंडळांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, शिंदे सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी यांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांचा सहभाग या मोहिमेचे गांभीर्य अधोरेखित करतो.
  • दुसरीकडे, भारताच्या या आक्रमक डिप्लोमॅटिक खेळीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने नवा प्लॅन आखला आहे. ‘शांतीदूत’ बनून जगापुढे आपली बाजू मांडण्याचा. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले असून हे प्रतिनिधी मंडळ विविध देशांमध्ये जाऊन पाकिस्तानची बाजू मांडणार आहे.
  • बिलावल यांनी सोशल मीडियावर लिहिले, ही जबाबदारी स्वीकारून मला पाकिस्तानची सेवा करण्याचा सन्मान मिळत आहे. हा काळ कठीण आहे, पण शांततेसाठी आमचा प्रयत्न चालू राहील. पण खरा प्रश्न असा आहे, अनेकदा चुकीची माहिती आणि फसव्या दाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानकडून जगाला नेमके काय सांगितले जाणार?
Share This Article