- खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी हे पुस्तक लिहिले असून राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे.
- या पुस्तकातून मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची माहिती राऊत यांनी सांगितली आहे. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांना केलेल्या मदतीची देखील माहिती दिली आहे. बाळासाहेबांनी शहांवर उपकार केल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
- गुजरात दंगल प्रकरणात शहा संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना कसे वाचवले? अमित शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला फोन केला? पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचे सरकार होते. गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरु होता. याचदरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकले होते.
- कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे योग्य नसल्याचे मत पवारांचे होते. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकारांचे स्मरण पुढे किती ठेवले? असा सवाल या पुस्तकातून विचारण्यात आला आहे.
- अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते. त्यांना तडीपारही केले होते, शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. पवारांनी त्यांना मदत केली. अमित शहांना एका प्रकरणात जामीन मिळाला. अमित शहा गुजरातच्या दंगली नंतर प्रचंड अडचणीत होते. दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
- तेव्हा अमित शहांना कोणीतरी बाळासाहेब यांचे नाव सुचवले होते. त्यानंतर भर दुपारी अमित शहा हे लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले. ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शहा हे मातोश्रीवर आले आणि बाळासाहेब यांच्या एका फोनने अमित शहांना कसे वाचवले हे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारांची किती जाण ठेवली?, असा या पुस्तकातून राऊतांनी सवाल केला आहे.
पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवले
