एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला नवे आव्हान दिले आहे. पाकिस्तानातील महत्त्वपूर्ण हवाईतळ रहीम यार खानचे भारताच्या हल्ल्यात चांगलेच नुकसान झाले आहे. पहलगाम हल्ल्याला उत्तर देताना भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. यातच रहीम यार खान या तळाचे नुकसान झाले. या हवाई तळाची धावपट्टी नष्ट झाली आहे.
मात्र, तरीही पाकिस्तान आपले काही नुकसान झालेले नाही, यावरच अडून बसलेला आहे. यावरून ओवैसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना लक्ष्य केले आहे. भाड्याची चिनी विमाने तरी तुमच्या या रहीम यार खान तळावर उतरवू शकता का, असा सवाल ओवैसी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांना केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक ट्वीट देखील त्यांनी केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर आपली भाड्याची चिनी विमाने रहीम यार खान हवाई तळावर उतरवू शकतील का, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. हा हवाईतळ जवळपास आठवड्याभरासाठी बंद करण्यात आला असतानाच ओवैसी यांनी हे विधान केले आहे. आपल्या या ट्वीटच्या माध्यमातून ओवैसी यांनी चीनला देखील लक्ष्य केले आहे.