क्राईम
दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आक्रमक

- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. हिंदू नागरिकांसह मुस्लिम नागरिकांकडूनही पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक बैठकीत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच आज दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू नागरिकांसह मुस्लिमांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. निदर्शने करणाऱ्या मुस्लिमांनी मोदींकडे बॉर्डरवर जाण्याची मागणी केली आहे.
- मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने अतिशय भ्याड कृत्य केले आहे. हा पाक नाही तर हा नापाक देश आहे. त्यामुळे आम्ही भारताच्या पंतप्रधानांना सांगतोय की, त्यांनी बदला घ्यावा. दहशतवाद्यांनी कलमा वाचायला सांगत हिंदू आहे की मुस्लिम? असे विचारले आणि गोळ्या झाडल्या. हे दहशतवादी मुस्लिम असूच शकत नाहीत. त्यामुळे आम्ही मोदींकडे विनंती करतो की, त्यांनी आम्हाला बॉर्डरवर जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही बॉर्डरवर जाऊन धर्म विचारणाऱ्या दहशतवादी मुस्लिमांना जय श्रीरामचे नारे देऊन मारू. कारण त्यांनी आमच्या हिंदुस्थानी भावांना मारले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम संघटनांनी दिली आहे.
- मुस्लिम संघटनांनी म्हटले की, आम्हाला मोदींवर गर्व आहे. त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा. हिंदुस्थानच्या नक्शावरून पाकिस्तानचे नाव निघून गेले पाहिजे. पाकिस्तानचा नायनाट करावा. पाकिस्तानला मुळापासून नष्ट करावे.