पहलगाममध्ये पाकिस्तानातील लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळीबार करून ठार केले. शिवाय या हल्ल्यात अनेकजण जखमीही झाले आहेत. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे आणि पाकिस्तानवरही टीका सुरू आहे.
दरम्यान या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची भारताने पूर्ण तयारी केली असून बुधवारी पंतप्रधान मोदींनी सीसीएसची बैठक घेत पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानाने आज भारतविरोधी काही वेगळे निर्णय घेत प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करून दाखवला. उलट भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये भारतासोबत व्यापर बंदी, भारतीय राजदूतांना ३० एप्रिलपर्यंत भारतात परतण्याचे आदेश आणि पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर बंद यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना मायदेशी जाण्यास चार दिवसांची मुदत दिली गेली आहे. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानातील सर्व द्विपक्षीय करार स्थगित केले आहेत. शिमला करार रद्द करण्याची धमकीही दिली आहे.
खरंतर भारताने याआधीच पाकिस्तानमधील भारतीय उच्चआयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांना परतण्याच्या सूचना केलेल्या होत्या, त्यामुळे पाकिस्तानने आज घेतलेल्या या निर्णयास फारसे काही महत्त्व उरले नव्हते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधू जल करारास स्थगिती देऊन भारताने पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून आता स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात आधीच कर्जबाजारी असलेल्या पाकिस्तानाने भारतासोबतचे व्यापारी संबंध बंद करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतल्याचे बोलले जात आहे.