एकच नंबर! भारताचे ‘सुदर्शन चक्र’ चालले

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतावर हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यासाठी 15 शहरांना टार्गेट बनवले गेले. यात भारताच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचाही समावेश होता. पण भारताच्या हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली एस-400 एसएएमने पाकिस्तानच्या या खटाटोपावर पाणी फेरले.
काल रात्री पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. भारताच्या दिशेने येणारे पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आले. पाकिस्तानच्या कोणत्याही अशा प्रकारच्या कृत्याला रोखण्यासाठी भारताच्या सीमेवर ‘सुदर्शन चक्र’ सज्ज उभे आहे. भारताकडे रशियाकडून मिळालेली लांब पल्ल्याची हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली एस-400 एसएएम (सरफेस टू एअर मिसाइल) आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी सीमेवर सुदर्शन तैनात आहे. भगवान कृष्णाच्या शक्तिशाली सुदर्शन चक्राच्या धर्तीवर भारतीय हवाई दलाने याला सुदर्शन असे नाव दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने बुधवारी रात्री भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. या शहरांवर पाकिस्तान क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने हल्ला करणार होता. भारताच्या सुरक्षा कवचाने म्हणजेच सुदर्शनने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली गेली. भारताने गुरुवारी सकाळी पाकिस्तानला लाहोरमध्ये जाऊन याचे प्रत्युत्तर दिला. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट करण्यात आली.



