कोल्ड ड्रिंकमधून विष देऊन बालमित्रालाच संपविले

मैत्री म्हटले की एकमेंकावर जीवापाड प्रेम असते. बालपणाच्या मैत्रीबाबत तर सांगायलाच नको. पण मैत्रीत घातही होतो. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशीच घटना घडली. एका 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली. दरम्यान यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्येचे कारणही समोर आले आहे. मृत मित्र श्रीमंत घरचा असल्याने तो श्रीमंती दाखवत होता. याचा हेवा वाटल्याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
वेदांत खंदाडे मृतकाचे नाव आहे. मिथिलेश चकोले असे आरोपीचे नाव आहे. वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते. वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती. त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकून ते या परिसरात राहायला आले. तेव्हा वेदांत आणि मिथिलेश मैत्री झाली. मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे. दोघेही चांगले मित्र असल्याने 8 एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले. एका पानटपरीवर दोघांनी कोल्ड ड्रिंक घेतली. मिथिलेशने बाटलीमध्ये विष टाकले. त्याने केवळ कोल्ड ड्रिंक पिण्याचे नाटक केले. परंतु वेदांतने कोल्ड ड्रिंक सेवन केले. त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू विष पिल्याने झाल्याचे समोर आले. पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्राची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.