ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात

कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत हे चौघे ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे – पंढरपूर मार्गावर लासूर्णे येथून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता. माळशिरस) येथील पुलावर आज सकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्विनी दूर्गेश घोरपडे हे तिघे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे त्यांच्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पठार फिरण्यासाठी गेले होते. यावेळी नातेपुते येथून ते राँग साईडने पुढे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी लासूर्णे पासून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आली. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले.