सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात गोळीबाराचा थरार

- जुन्या वादातून दाम्पत्यावर गोळ्या झाडल्याचा प्रकार सोलापुरातील मोहोळ येथे घडला आहे. मोहोळ तालुक्यातील रोपळे-येवती मार्गावर काल रात्री गोळीबाराचा थरार घडला. पूर्ववैमनस्यातून शिवाजी पुंडलिक जाधव (वय ४२) आणि त्यांच्या पत्नी सुरेखा शिवाजी जाधव (वय ३८) या दाम्पत्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. या हल्ल्यात शिवाजी यांना एक गोळी लागली, तर सुरेखा यांना तीन गोळ्या लागल्या. सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोघांनाही तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुरेखा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
- या प्रकरणी पोलिसांनी दशरथ केरू गायकवाड (वय ४५, रा. रोपळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी शिवाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दशरथ गायकवाड याला जमिनीच्या वादातून मारहाण केली होती. या घटनेनंतर दशरथने जाधव कुटुंबीयांविरुद्ध कायमच राग धरला होता. या जुन्या वैमनस्यातूनच दशरथने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या रात्री दशरथने जाधव दाम्पत्याला रस्त्यावर एकटे पाहून अचानक गोळीबार केला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे बोलले जात आहे.
- दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.