राजकीय
मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक जुनी आठवण सांगितली. मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या म्हणत लोक येतील, तेव्हा बावनकुळेंना कळेल माझ्यावरही हे बेतले होते, असा अनुभव गडकरी यांनी सांगितला.
गडकरी पुढे म्हणाले, पक्षाची स्थापना करताना आपण काही उद्दिष्टं बाळगली होती. ही उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या कार्यालयासाठी कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचे कार्यालय आपण विकत घेतले. पक्षाचे कार्यकर्ते गिरीश व्यास यांनी जागा दिली. येथे काही भाडेकरू होते. त्यांच्याशी बोलून ही जागा आता मोकळी झाली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की मुर्ख लोक जागा बांधतात आणि शहाणे माणसे किरायाने राहतात. याचा उत्तम अनुभव या कार्यालयाच्या जागेतून किरायेदार खाली करताना आला.
मी बावनकुळे यांना सांगितले, मी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही केल्या. जातीचे सेल उघडून फायदा नाही. जातीचे सेल करुन कुठल्या जाती जुळल्या नाही. ज्या जातीच्या नेत्याला आपण घेतले. त्या लोकांना जातीने स्वीकारले नाही. आता मनपा निवडणुकीत आमच्या जातीला एवढे तिकीट द्या म्हणून लोक येतील, तेव्हा बावनकुळे यांना कळेल. माझ्यावर हे बेतले आहे, असा खास अनुभव गडकरी यांनी सांगितला.