क्राईम
बॉयफ्रेंडच्या त्रासास कंटाळून 23 वर्षीय तरूणीची आत्महत्या
- राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी येथे 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवला होता. तसेच तीन पानांची चिठ्ठीही लिहिली होती.
- ही आत्महत्या प्रेमसंबधात होणाऱ्या त्रासाला कंटाळून केल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- 23 वर्षीय मृत तरुणीच्या 50 वर्षीय आईच्या तक्रारीनुसार, अंबोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दोनवेळा गर्भवती केले होते. तसेच दोनवेळा तिचा गर्भपातही केला होता. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे आरोपी तिच्याकडून पैसेही घ्यायचा. याबरोबरच मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यामुळे आरोपीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध होता, असा आरोपही करण्यात आला आहे.
- तरुणीच्या आत्महत्येनंतर आईने तिचा मोबाईल तपासला. तेंव्हा तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बनवल्याचे समोर आले. याशिवाय मृत तरूणीने मृत्यूपूर्वी तीन पानांची चिठ्ठी लिहिली होती. त्यात तिने प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता. त्यात दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिली होती. तसेच आरोपी मोबाईल सेक्ससाठी तिच्यावर दबाव टाकायचा. तसेच विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी तगादा लावायचा, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.