क्राईम
ब्रेकिंग! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या API अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा अखेर खुलासा

- सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात तब्बल सात वर्षांनंतर पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला कलम 302 अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे.
- अश्विनी बिद्रे या 11 एप्रिल 2016 रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या आणि त्यानंतर दोघे कारमधून निघाले. याचवेळी कारमध्ये कुरुंदकरने बिद्रे यांची गळा दाबून निर्घृण हत्या केली. या घटनेच्यावेळी महेश फळणीकर देखील कुरुंदकरसोबत होता.
- संध्याकाळी 6.41 ते रात्री 11.11 या वेळेत ही हत्या झाली आणि नंतर 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी लाकूड कापायच्या कटरने अश्विनी यांचे शरीराचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकून दिले.
- अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर दोघेही विवाहित होते.
- दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कुरुंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनीशी लग्न करण्याचे वचन दिले होते. यामुळे अश्विनीने तिचे पती राजू गोरे यांच्याशी संबंध तोडले होते. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी असून ती वडिलांकडे राहते.
- कोर्टाने कुरुंदकरला दोषी ठरवताना हेही मान्य केले की त्याने आधी विश्वासार्हता निर्माण करून नंतर अश्विनीचा विश्वासघात केला. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचेही कोर्टाने मान्य केलं. मात्र, आरोपी राजू पाटील याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.