क्राईम
ब्रेकिंग! प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर कोर्टात हल्ला, पोलिसांनी हल्लेखोराला पकडले

- इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना एका वकिलाने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. अमितकुमार भोसले असे हल्लेखोर वकिलाचे नाव आहे. दरम्यान कोरटकर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून कोरटकर फरार झाला होता. अनेक दिवस परागंदा राहिल्यानंतर अखेर तेलंगणातून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारीही सुनावणीवेळी कोरटकर याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. आजच्या सुनावणीत त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. सुनावणी संपवून त्याला कोठडीकडे नेत असताना गाडीत बसवण्याआधीच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
- कोल्हापूर न्यायालयाच्या मुख्य द्वारातून कोरटकरला न आणता माध्यमांना चकवा देऊन मागील दाराने पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले. बुधवारच्या हल्ल्यानंतर पोलीस सतर्क झाले होते. त्यामुळे बाहेरील एकही माणूस न्यायालयात येणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली. परंतु भोसले हे वकिलच असल्याने ते आधीपासूनच न्यायालयात होते. ते हल्ला करेल, अशी शंका कुणालाच आली नाही.
- एरवी न्यायालयाच्या आवारात भोसले नेहमी वावरत असतात. त्यामुळे पोलिसांनाही त्यांच्यावर शंका आली नाही. जशीही सुनावणी संपली आणि कोरटकरला घेऊन पोलीस कोठडीकडे निघाले, तसा अमितकुमारही सावध झाला.
- कोरटकर गाडीत बसण्याआधीच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न अमितकुमार यांनी केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून अमितकुमारला बाजूला केले.