क्राईम
औरंगजेब कबर…धार्मिक तेढ अन् सोशल मीडिया

- सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद निर्माण झाला आहे. नागपुरमध्ये झालेली दंगल हे त्याचेच उदाहरण आहे. दरम्यान पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आरोप केला जात आहे. औरंगजेबाचा फोटो आणि रील्स प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे औरंगजेबावरुन महाराष्ट्रातील वातावरण अधिक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा येथील एका व्यक्तीवर सोशल मीडिया पोस्टद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्राम आयडीवर औरंगजेब यांच्या संबंधित इन्स्टाग्रामवर तीन रील्स तयार करण्यात आले. या रील्समध्ये आक्षेपार्ह आणि मानहानीकारक मजकूर होता. ज्यामध्ये थोर व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपीने समाजामध्ये धार्मिक तणाव आणि दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकले आणि त्यासोबत अनुचित चॅटिंगही केले. ही घटना 21 मार्च रोजी उघडकीस आली आणि 22 मार्च रोजी 12.56 वाजता गुन्हा अधिकृतपणे नोंदवण्यात आला. बशीद शेख असे आरोपीचे नाव आहे.
- तसेच चमनशहा दर्गा परिसरात काही व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त कॅप्शनसह औरंगजेबाचे फोटो पोस्ट केले. या पोस्टद्वारे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत गायकवाड (वय 24) यांनी तक्रार दाखल केली होती. या पोस्टमध्ये सहभागी असलेल्या तीन इन्स्टाग्राम आयडी धारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये इरफान खान, शेख अर्ब या दोघांचा समावेश आहे.



