देश - विदेश
पाकिस्तानी महिलेशी लग्न केलेल्या सीआरपीएफ जवानाची हकालपट्टी

- पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. देशात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा भारत सरकारने रद्द केले आहेत. यानंतर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानी महिलेशी लग्न केले होते. परंतु, ही माहिती त्याने लपवून ठेवली होती. सत्य समोर आल्यानंतर या जवानाला बडतर्फ करण्यात आले आहे.
- मुनीर अहमद असे या जवानाचे नाव आहे. मुनीरचे हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी निश्चितच धोकादायक आहे, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. याच वर्षात मार्च महिन्यात मुनीरने मीनल खान नावाच्या एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता. अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानची नागरिक असलेल्या मीनल हिच्याशी मुनीरने लग्न केले होते. यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसा घेऊन भारतात आली होती. नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 मध्येच संपली होती. तरीही ती भारतातच राहत होती.
- पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानींचे सर्व व्हिसा रद्द करून त्यांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले होते. यानंतर मीनलची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. तसेच जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर तिला आणखी काही दिवस भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 14 मे रोजी होणार आहे. दरम्यान पाकिस्तानी नागरिकाबरोबर केलेला विवाह लपवणे, त्याच्या व्हिसाची मुदत संपली असतानाही त्याला शरण देणे या कारणांमुळे मुनीरला तत्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.