मोदींना सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घाला

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, दिल्ली हायकोर्टात एका वकीलाने याचिका दाखल करत मागणी केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास बंदी घालावी. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी कथितरित्या देव व धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखले पाहिजे.
या याचिकेत म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांनी देवाच्या नावावर मते मागितली आहेत. आनंद एस. जोंधळे नावाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. जोंधळे यांनी आपल्या याचिकेत मोदींच्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे ९ एप्रिल रोजी केलेल्या भाषणाचा हवाला देत म्हटले आहे की, त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू धार्मिक स्थळे तसेच शीख देवतांचे वर्णन करत मतदान करण्याचे आवाहन केले. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत मोदी यांच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास बंदी लादण्याची मागणी केली आहे.