क्राईम

ब्रेकअपनंतरच्या संशयातून प्रेयसीची हत्या

  • ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे दुसऱ्या युवकाशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून प्रियकराने तिच्यावर थेट चाकूहल्ला केला. यात त्या तरुणीचा (22) जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला आहे. सध्या त्याच्यावर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयाने या तरुणाला सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
  • निकेश सुधाकर शिंदे (25, दिवेगाव, ठाणे) याचे नवीन पनवेलमधील सेक्टर 18 मध्ये राहणाऱ्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण होऊन ते वेगळे (ब्रेकअप) झाले. ब्रेकअपनंतर तिचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निकेश याला येत होता. या रागातून तो ३१ जानेवारीला प्रथम तिच्या कार्यालयात गेला आणि तिच्याशी भांडला. एवढेच नाही तर दुसऱ्या कुणासोबतही प्रेमसंबंध नकोत, असा दमही तिला भरला. तसेच त्यानंतर तिला शिवीगाळ केली.
  • त्यानंतर दोघेही तिच्या घरी आले. त्यानंतर निकेशने तिच्या गळ्यावर चाकू चालवला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर निकेशने स्वत:च्या गळ्यावर चाकू चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मृत युवतीची बहीण आणि आई यांनी त्याला पकडले आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्याला कामोठीमधील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या हत्येचा तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. 

Related Articles

Back to top button