मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्याचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. दरम्यान, बीडमधील मारहाणीच्या हत्येचा क्रूर पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये येऊन पोहोचला आहे. माळशिरसमध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
या तरुणाच्या संपूर्ण पाठीवर सळईने चटके दिल्याच्या खूणा आहे. अख्ख्या पाठीवर एकही जागा नाही जिथे चटके दिलेले नाहीत. तरुणाची अशी क्रूर हत्या झाल्याने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द पाटील या 28 वर्षीय तरुणाचा माळशिरस- पिलीव रोडवरील वनविभागाच्या क्षेत्रात निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. आकाशच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा दिसून आल्या. त्याच्या पाठीवर आणि अंगावर लोखंडी सळईने चटके दिल्याचे डाग होते.
मुलाची ती अवस्था पाहताच आकाशच्या वडिलांचा बांध सुटला. आकाशची हत्या कोणी केली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, आकाशच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अनैतिक संबंध किंवा प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी एक तरुणी आणि एक अल्पवयीन मुलाला माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.