क्राईम
लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झाले?

- बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून खोक्याचा शोध सुरू आहे. मात्र, खोक्याने आता स्वत: समोर येत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे. आपण गुंड नसून सामाजिक कार्यकर्ता असल्याचेही खोक्याने सांगितले आहे. मारहाण आणि इतर कलमातंर्गत खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारनामे बाहेर आल्यानंतर खोक्या भूमिगत झाला. मात्र, खोक्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपली बाजू मांडली आहे.
- माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता. माऊली हा माझा वंजारी समाजातील मित्र आहे. माऊलीच्या पत्नीला ती व्यक्ती छळत होती. तुझा आंघोळ करतानाचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल करेन, असे तो सांगत होता. जर तू माझ्यासोबत काही गोष्टीला हा म्हणालीस तर मी हा व्हिडीओ व्हायरल करणार नाही, अशी धमकी सारखी ती व्यक्ती देत होती. अखेर माऊलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मी संतापाने त्या व्यक्तीला मारहाण केली असल्याचे भोसले याने सांगितले. या प्रकरणाचे माऊलीकडे सगळे पुरावे आहेत, त्याची दहा लाखांची फसवणूक झाली असल्याचेही खोक्याने सांगितले.
- आपण गुंड नसल्याचे सांगताना भोसले याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना चुकीची माहिती दिली गेली असल्याचे त्याने सांगितले. गुंड कशाला म्हणतात, माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहा. माझे जे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, ते व्हिडीओ पूर्ण व्हायरल करा. त्या शाळेत जा, मुलींची चौकशी करा. असे आवाहनही त्याने दिले. मी हातपाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्या शाळा-कॉलेजमधील मुलींची छेड काढल्याचे प्रकार बंद झाले असल्याचे त्याने सांगितले.
- मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले तो आनंदाचा क्षण होता. माझे पैसे मी उधळणारच ना. मी तो कष्टाने कमावलेला पैसा होता. लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झाले?, असा सवाल खोक्या भाईने विचारला आहे.