खेळ
एका रोहितसाठी दुसरा रोहित सरसावला

- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. रोहितच्या वाढलेल्या वजनावर त्यांनी टिप्पणी करत त्याला लठ्ठ म्हटले होते. तसेच त्याला भारतीय इतिहासातील सर्वात ‘अप्रभावशाली’ कर्णधार ही म्हटले होते. त्यानंतर त्यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला होता. एकीकडे भाजपकडून टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या नेत्याने ही डॉ. शमा यांना खडे बोल सुनावले आहेत.
- एका रोहितवर टीका होत असताना त्याच्या बचावासाठी दुसरा रोहित मैदानात उतरला आहे. दुसरा रोहित हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत. त्यांनी डॉ. शमा मोहम्मद यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांना क्रिकेटबाबत काय माहित आहे? त्यांनी कधी क्रिकेट खेळलेय का? हे सर्व खेळाडू प्रख्यात आहेत. ते देशाचे प्रतिनिधित्व करतात. राजकारणी होणे सोपे असते, मात्र खेळाडू म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणे हे सोपे नसते, असे रोहित पवार म्हणाले.
- राजकारण्यांनी राजकारणावर बोलावे, खेळाबाबत बोलू नये. मी रोहितचा फॅन आहे. त्यामुळे अशी विधाने करणे टाळले पाहिजे. डॉ. शमा मोहम्मद यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही रोहित पवारांनी केली.



