राजकीय
राज्यात हायव्होल्टेज लढत

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचे उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही आहे.
अजितदादा पवार यांच्याही नावाने उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. बारामती मतदारसंघातील निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणूक अधिकारी कार्यालयातून अर्जही नेले आहेत. याचबरोबर अजितदादा यांच्या नावानेही अर्ज नेले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता अजितदादा बारामतीत डमी उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐनवेळी काही गडबड होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांनी बाद झाला तर उमेदवारीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशावेळी पर्याय पाहिजे. त्यामुळेच अजितदादा यांच्या नावाचा एक अर्ज भरण्यात येणार आहे.



