क्राईम
राणीने स्वीकारला इस्लाम, मग मुलावर धर्म बदलण्यासाठी दबाव

- एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलाने आईवर आणि सावत्र पित्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यातून मदतीची मागणी केली आहे. त्या व्हिडिओमध्ये तो साखळदंडाने बांधलेला दिसत आहे. त्याच्या आईने इस्लाम स्वीकारला. त्यानंतर त्याची आई आणि सावत्र पित्याने त्याच्याही इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव आणला, असा आरोप केला आहे. पोलिसांनी त्या मुलाला सोडवले आहे.
- मध्य प्रदेशातील खंडवा येथील पीडीत मुलाच्या वडीलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई राणीने रउफ शाह याच्याशी लग्न केले. राणीला दोन मुले होती. दोघांना तिने माहेरी सोडले होते. रउफ याचेसुद्धा हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर राणीने इस्लाम धर्म स्वीकारला. राणीने मुलास 2 मार्च रोजी तिच्या घरी बोलवले. मुलगा जेव्हा आईकडे आला तेव्हा त्याच्यावर हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव सुरु केला. त्याने नकार दिल्यावर त्याचा छळ सुरु केला. त्याला मारहाण केली. त्याच्या दोन्ही पायांमध्ये साखळदंड बांधले.
- तीन दिवस त्याला एका खोलीत बंद ठेवले. सातत्याने धर्म परिवर्तन करण्याचे ती मुलास सांगत होती. मंगळवारी संधी साधून मुलाने आईच्या मोबाइलवरून व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ खंडवा पोलीस आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठवला. व्हिडिओमध्ये त्याने मदतीची याचना केली आहे. व्हिडिओमध्ये मुलाच्या पायात बांधलेल्या बेड्या स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, त्याच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
- अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पूर्णपणे सतर्क झाले. व्हिडीओमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी पोहचून पोलिसांनी मुलाची सुटका केली. मुलाच्या तक्रारीनंतर राणी आणि रउफ यांच्याविरुद्ध खांडव्याच्या मुगत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात दबाव टाकून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा आरोप होता. पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले आहे, तर सावत्र वडील फरार झाले आहेत.