स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर

स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांची लुटमार करायचा, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी दत्ता रामदास गाडे (वय ३६) याच्याविरोधात शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगरमधील सुपा पोलिस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. या सहाही गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलाच असून त्यापैकी एक गुन्हा विनयभंगाचा असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत असून त्याने यापूर्वीही महिलांसोबत अशाप्रकारे इतरही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान पुणे पोलिसांनी गाडेची कुंडली काढली असून त्यात दत्ता गाडेचा स्वारगेट बसस्थानकच नव्हे तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बसस्थानक परिसरात मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. इतर बस स्थानकांच्या तुलनेत तो स्वारगेट बसस्थानकातच अधिक काळ वावरला असल्याची माहिती समोर आली आहे.