लाडक्या बहिणींची लॉटरी!

राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. यात लाडकी बहीण योजनेने महत्वाची भूमिका बजावली आहे. या योजनेचे काही हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. दरम्यान, निवडणुकी आधी या योजनेची रक्कम ही दीड हजार वरुन २१०० रुपये करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. निवडणुकीच्या प्रचारा जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रक्कमेत वाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. याबाबत शिंदे यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता २१०० रुपये केले जाणार आहेत. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे. त्यामुळे या योजनेची रक्कम ही २१०० रुपये केली जाणार आहे.