क्राईम
तू माझी जिंदगी बरबाद केलीस

- घरात घुसून एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. नातेवाईक असलेल्या तरुणानेच हत्या केली आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना खिल्लारी ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाचन करत बसली होती. त्यावेळी आरोपी अभिषेक हा तिच्या घरी गेला आणि संजना कुठे आहे अशी विचारणा केली. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी संजना वरच्या मजल्यावर आहे, असे सांगितले.
- त्यानंतर अभिषेक थेट वरच्या मजल्यावर गेला आणि तू माझी बदनामी का केली, तू माझी जिंदगी बरबाद केली, असे म्हणत संजनावर चाकूने वार केला. अभिषेकने आधी संजनाच्या छातीजवळ वार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संजना घाबरली आणि तिने गॅलरीमध्ये येऊन आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत अभिषेक याने तिच्या कमरेजवळ दुसरा वार केला.
- दरम्यान संजनाचा आवाज आल्यामुळे तिचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर धावले. मात्र, तोपर्यंत अभिषेक पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजनाला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गोरेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक यास सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.