क्राईम
बीडमधून मोठी बातमी समोर
- मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला.
- देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनीच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली केली. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकातील काही पोलिसांचे आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शन असल्याचे देखील समोर आले. काही पोलिसांनी वाल्मिकला मदत केल्याचाही आरोप झाला.
- आता पुन्हा एकदा बीडमध्ये दोन पोलिसांनी काही गुन्हेगारांना मदत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आर्थिक फायद्यासाठी आपली निष्ठा गहाण ठेवणाऱ्या दोन पोलिसांवर बीडचे नवे पोलीस अधीक्षक कांवत यांनी मोठी कारवाई केली आहे.
- वाळू तस्करांशी हातमिळवणी करून आर्थिक लाभ घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं कांवत यांनी निलंबन केले आहे.
- पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गेवराई येथील गोदावरी नदीत बेकायदा वाळू उपसा केला जात होता. दिवसाढवळ्या हे वाळू उत्खनन सुरू होते. याप्रकरणी कांवत यांनी गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
- मात्र दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले. शिवाय त्यांनी गुन्हा दाखल करण्यासही उशीर केला. त्यांनी वाळू तस्करांशी हातमिळवणी करून पैशांसाठी अशी दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कांवत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.