मेहुणीसोबत प्रेमसंबंध; पत्नी ठरत होती अडसर
राज्यात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून, पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे याने अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, डॉक्टरने पत्नीची हत्या केल्यानंतर हा सगळा प्रकार दरोडा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता.
या माध्यमातून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आणि एका फोटोमुळे या हत्येचा उलगडा झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. दाभाडी गावातील टेकाळे यांनी आपल्या पत्नीच्या हत्येसाठी फुलप्रूफ प्लॅनिंग केले होते आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला होता.
टेकाळे यांचे त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. याची कल्पना त्यांच्या पत्नीला अजिबात नव्हती. परंतु या प्रेमसंबंधात पत्नी अडसर ठरत होती. त्यामुळे मेहुणीने आपल्या सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर, अशी अट घातली होती. मेहुणीच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या डॉक्टर टेकाळे यांनी पत्नीच्या हत्येचा कट रचला.
या योजनेनुसार, १८ जानेवारीच्या रात्री डॉ. टेकाळे यांनी पत्नी माधुरी टेकाळे यांच्या एका चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली. ते खाल्ल्यानंतर माधुरी यांना लवकरच झोप लागली. माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी उशीने तोंड दाबून त्यांचा जीव घेतला.
त्यानंतर घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले जेणेकरून हा प्रकार दरोडा वाटावा. त्यानंतर स्वतः टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध पडल्याचा बनाव केला.
१९ जानेवारीच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. तपासा दरम्यान, पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे ठसे आढळले नाहीत आणि श्वानपथकाच्या हाती देखील काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान, पोलिसांना टेकाळे यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला. हा फोटो त्यांच्या मेहुणीचा होता. टेकाळे यांचे मेहुणीसोबत गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते आणि तिनेच त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. त्यामुळेच त्यांनी पत्नीची हत्या केली.
सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर, यासाठी डॉक्टरला त्यांची मेहुणी त्रास देत होती. त्यामुळेच पत्नीची हत्या केल्याचे गजानन टेकाळे याने पोलिसांसमोर कबूल केले. या घटनेमुळे डॉक्टरचा बनाव उघडकीस आला. आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीलाही अटक केली आहे.