गाडी आणि आयशरच्या झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जखमी 11 जणांपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंजाबमधील फिरोजपूर-फाजिल्का मार्गावरील मोहन गावाच्या उताडजवळ आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अत्यंत भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीने आयशरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातानंतर गाडीतील प्रवासी अक्षरश: बाहेर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी गाडीतून 25 हून अधिक जण प्रवास करत होते. जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप गाडी गुरु हर सहाय येथून जलालाबादकडे जात होती. बोलेरोमध्ये मजूर प्रवाशी प्रवास करत होते. त्याचवेळी जलालाबादहून फिरोजपूरच्या दिशेने कॅन्टर जात होता. शहीद उधम सिंग कॉलेजजवळ पोहोचल्यावर अचानक दोघांमध्ये टक्कर झाली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील सर्व लोक अपघातस्थळापासून दूरवर फेकले गेले. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.