राजकीय
पक्ष नेतृ्त्वाची खेळी जिव्हारी लागली
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. काँग्रेसलाही आता धक्के बसू लागले आहेत. नवी मुंबईत काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे, त्यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे नवी मुंबईचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
- विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून उमेदवारीची तयारी अनिकेत यांनी केली होती. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. या मतदारसंघात म्हात्रे कुटुंबाचा दबदबा आहे तरी देखील पक्षाने त्यांचा विचार केला नाही. दरम्यान, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- त्यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. आता हे पद तरी आपल्याला मिळावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांचा विचार केला नाही. त्याऐवजी अरविंद नाईक यांना जिल्हाध्यक्ष केले. पक्ष नेतृ्त्वाची ही खेळी म्हात्रे कुटुंबियांच्या जिव्हारी लागणारी होती. त्यांच्यातील नाराजी आणखीनच वाढली. या नाराजीतूनच ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि अनिकेत यांनी देखील पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे कुटुंबियांच्या या निर्णयानंतर नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व राहणार का, यानंतर म्हात्रे कुटुंबीय कोणता राजकीय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.