ब्रेकिंग! बीडमध्ये पाऊल ठेवताच अजितदादा कडाडले, माझी कामाची पद्धत वेगळी
बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले. अजितदादा यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांचे स्वागत केले. आपल्या पहिल्याच दौऱ्यात अजितदादा यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. विकासकामे करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही असा थेट इशाराच अजितदादांनी दिला.
अजितदादा यांचे आज सकाळी बीडमध्ये आगमन झाले. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजितदादा यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेले मुंडेदेखील उपस्थित होते. यावेळी अजितदादा यांनी म्हटले की, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली कामे मंजूर झाली तर ती कामे दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा, लांबचा हे पाहणार नाही.
मी बघतो, कोणी रिवॉल्वर काढते, वर रिवॉल्वर उडवतात. कुणी त्या लावून फिरते असं म्हणत जे कोणी रिवॉल्वर लावून फिरेल त्यांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत. रिवॉल्वर स्वसंरक्षणासाठी असून, तुमचे हे Reel वगैरे बनतात ते मी खपवून घेणार नाही. मी सर्वांना सारखा नियम लावणार आहे. कोणावर निशाणा साधायचा नाही, पण बदल झालाच पाहिजे, असा आग्रही सूर अजितदादा यांनी आळवला.