ब्रेकिंग! मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का

Admin
2 Min Read
  • बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजितदादा यांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच शासनाने नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार धस यांना सरकारकडूनच धक्का देण्यात आला.
  • राज्य सरकारच्या या आदेशात बीड जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित, भाजप आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि आष्टीचे भाजप आमदार धस यांना मात्र डावलण्यात आले आहे. आता धस आमदार असतानाही नियोजन समितीत त्यांना स्थान मिळाले नाही, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आमदार धस यांनी आरोपांचा धुरळा उडवून दिला. यातच त्यांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली होती. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सोळंके यांनीही मुंडेंना चांगलेच धारेवर धरले होते.
  • प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा धस यांच्याबाबत अजितदादा यांना काही विचारायचे त्यावेळी उत्तर देताना अजितदादा यांच्या आवाजात संताप स्पष्ट जाणवत होता. धस काय बोलतात याचे मला काहीच देणे घेणे नाही, असे अजितदादा म्हणाले होते.
Share This Article