सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून आरोपींच्या अटकेसाठी पुढाकार घेणारे भाजप आमदार सुरेश ध यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परळीतील अवैध धंद्यांवरून बीडमधील दोन्ही मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. तसेच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आता दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत धस यांनी प्रश्न उभे केले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी ‘आका’ आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोटही धस यांनी केला आहे. तर देशमुख हत्या प्रकरणात मी जे आरोप केले त्याचे पुरावे एसआयटीने पुढे आणले आहेत. ‘आका’चा संबंध आहे हे स्पष्ट होत असल्याचेही समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ते म्हणाले.
अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेले होते आणि मारत आणले होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्हीमध्ये आका, चाटे, घुले हे आहेत हे स्पष्ट दिसत आहे, असे म्हणत धस यांनी ‘आका’चा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सूचित केले आहे. या प्रकरणात पीआय पाटील याला सहआरोपी केले पाहिजे, महाजनला आणि गर्जेंना बडतर्फ केले पाहिजे किंवा गडचिरोलीला पाठवले पाहिजे, अशी मागणी धस यांनी केली आहे.