ब्रेकिंग! अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार

बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालायाने म्हटले आहे. जबाबदार असणाऱ्या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालाने दिले आहेत.
शिंदेच्या आई वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले आहेत. न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात बदलापूर एन्काऊंटर फेक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले आहे.
चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटले आहे. शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटते एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पाच पोलिस आरोपीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यामुळे कायद्यानुसार पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना या प्रकरणाचा तपास कोणती तपास यंत्रणा करेल हे दोन आठवड्यांत खंडपीठाला सांगण्यास सांगितले आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. तसेच बंदुकीवर शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.



