क्राईम

लिफ्ट मागितली, बाईकवरून निघाले पुढे घात झाला

पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डंपर व बाईक यांच्यात झालेल्या अपघातात एका माजी मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रेयश प्लीरा नर्सरी समोर काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव (ता. दौंड) येथील माजी मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे (वय-59 रा फ्लॅट नं सी – 2 लक्ष्मी विहार सोसायटी हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, पाठीमागील भरधाव डंपर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर नेवसे यांना शिक्षकांनी एलाईट चौकात सोडले. यावेळी नेवसे यांनी हडपसरकडे जाणाऱ्या एका बाईकला लिफ्ट मागितली व दोघेजण उरुळी कांचन येथून हडपसरकडे बाईकवर निघाले.

सोरतापवाडी येथील श्रेयश प्लीरा नर्सरी समोर आले असता त्यांच्या समोर असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक ब्रेक दाबला व पाठीमागे बसलेले नेवसे हे महामार्गावर खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेला डंपर त्यांच्या डोक्यावरून गेला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button