वाल्मिक कराडच्या संपत्तीचा अंदाज लागेना

मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील कथित मुख्य सुत्रधार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. बीडसह, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिकची संपत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली असून आता विदेशातही त्याची संपत्ती असल्याची चर्चा आहे.
महिला नातेवाइकाच्या नावावर वाल्मिकने बार्शी तालुक्यातील शेंद्री शिवारात साधारण ३६ एकर बागायती शेतजमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. या शेतीमध्ये सागवानाची हजार झाडे, पाचशे नारळाची झाडे आहेत.
या मालमत्तेचे अंदाजे शासकीय मूल्य दीड कोटी रुपये इतके आहे. शेंद्री येथील ही जमीन वाल्मिकने त्याच्या महिला नातेवाइकाच्या नावावर कशी खरेदी केली, यासाठी लागणारा पैसा कुठून आला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या जमिनीची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.