सोलापूर (प्रतिनिधी) मार्केट यार्ड येथील कांदा शेडचे वेल्डिंग करताना तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. आयान रफिक हेब्बल (वय 17 वर्षे 10 महिने, रा. किसान संकुल, अक्कलकोट रोड) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोईन मोहमद हनीफ शेख (वय 46, रा. ब्लॉक नं. 1, रूम 2 खतीब नगर, कोंडा नगर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सिकंदर सैफन शेख (वय 32, व्यवसाय वेल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, रा. किसान नगर, अक्कलकोट रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यात अधिक माहिती अशी की, फिर्यादीचा भाचा आयान हेब्बल हा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या असतानाही संशयित आरोपीने आयान याच्या गरीब परिस्थितीचा व मजबुरीचा फायदा घेऊन त्याला मार्केट यार्ड येथील कांदा शेडचे वेल्डिंग कामात मदत करण्यासाठी घेऊन गेला.
संशयित आरोपीने उंचीवरील काम करताना आयान यास कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध करून न देता हयगईने वागवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने फिर्यादीची वरील संशयित आरोपी विरुद्ध तक्रार आहे असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.14) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या पुढील तपास पोसई डेरे हे करीत आहेत.