मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडला आरोपी करून त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारपासून परळीत आंदोलन सुरू केले आहे. तसेच आज परळी बंदचीही हाक देण्यात आली आहे. तसेच कराड समर्थक टॉवरवर चढले असून त्याची पत्नी आणि आईने मकोका मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. परळीमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे.
कराडवर गंभीर आरोप असतानाही त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याची टीका करत सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, परळीत बिघडलेल्या परिस्थितीवर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कराड समर्थकांनी आणि त्याच्या विरोधकांनी न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वकील हेमा पिंपळे यांनी देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारवाईच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता पाहिजे. आमच्यासोबत महिला आहेत. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा-सुव्यवस्था सुधारा, असे त्यांनी म्हटले.