नवा ट्विस्ट ! महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?

ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज पवार यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत, याबाबत पत्रकारांनी पवार यांना विचारले. तेव्हा पवार यांनी एका वाक्यात हा विषय संपवत कार्यकर्ते जर मागणी करत असतील तर यात काहीच चुकीचे नाही, असे सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. ते एकत्र येऊन निर्णय घेतील. या तीन पक्षांतील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी, यासंबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीची जागावाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले. तसेच कुठल्याही पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता राज्यकर्ता व्हावा, असे वाटत असेल तर यामध्ये काहीच चुकीचे नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठांची टीम मुलाखती घेतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले.