भाचीने पळून लग्न केले, मामा संतापला

राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात येथे एका व्यक्तीने आपल्या भाचीच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातील जेवणात विषारी औषध मिसळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने जेवणात विष मिसळत असताना आचाऱ्याने त्याला रंगेहाथ पकडले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
महेश जोतीराम पाटील असे आरोपी मामाचे नाव आहे. पीडित भाची ही उत्रे गावात आपल्या मामाकडे राहायला होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणाने महेश याच्याकडे भाचीशी लग्न करायची मागणी घातली. पण महेशने या लग्नाला विरोध केला. यामुळे भाचीने पळून जाऊन, मामाच्या विरोधात जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न केले. यामुळे महेशचा आपली भाची आणि तिच्या सासरच्या मंडळीवर राग होता. याच रागातून महेशने थेट स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात विषारी औषध टाकले.
दरम्यान, भाचीने मागील आठवड्यात पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी मंगळवारी गावात वरात काढली होती. तसेच एका हॉलमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शेकडो पाहुणे उपस्थित होते. या पाहुण्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आरोपी महेश हातात औषध घेऊन समारंभ आयोजित केलेल्या हॉलमध्ये घुसला. त्याने काहीही कळायच्या आत बाटलीतून आणलेले औषध जेवणात मिसळायला सुरुवात केली. ही बाब पाहताच आचाऱ्याने त्याला विरोध केला. यावेळी झटापट झाल्यानंतर आरोपी महेश घटनास्थळावरून पळून गेला. आरोपी महेश फरार असून त्याचा शोध सुरू आहे.