महाराष्ट्र
शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते?

- गेल्या आठवड्यात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे चाकणला लोकार्पण झाले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व छगन भुजबळ हे एकाच व्यासपिठावर शेजारी-शेजारी बसले होते. याच कार्यक्रमात पवारांनी निमंत्रण पत्रिकेवर संदेश लिहून ती पत्रिका भुजबळांच्या हातात दिली होती. भुजबळांनी तो मजकूर गुपचूप वाचून फक्त स्मितहास्य केले होते. आता या चिठ्ठीत काय लिहले होते, याचे उत्तर स्वतः भुजबळांनी दिले आहे.
- चाकणमधील या कार्यक्रमासाठी पवार व भुजबळ हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. भुजबळ कार्यक्रमाला उशीरा आले. हे दोघेही शेजारी बसल्यानंतर बराच वेळ त्यांच्याच चर्चा झाली नाही. नंतर पवारांनी त्यांच्या हातातील निमंत्रण पत्रिकेवर काहीतरी लिहले. त्यानंतर ही पत्रिका शेजारी बसलेल्या भुजबळांच्या हातात दिली. भुजबळांनीही तो संदेश गुपचूप वाचला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. आता पवारांनी काय लिहले व भुजबळांनी काय वाचले, याची चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे.
- याच प्रश्नाचा धागा पकडून आज पत्रकारांनी भुजबळांना बोलते केले. पवारांनी त्या चिठ्ठीवर काय लिहले होते, असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, त्यावर काय लिहिले ते कसे सांगू..? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ, असे म्हणत भुजबळ मनसोक्त हसले. त्यांनी मोठ्या खुबीने हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. पर्दा ना उठाओ असे तुम्ही म्हणताय, की पवारांनी त्या चिठ्ठीत तसे लिहीले होते, असा सवाल एका पत्रकाराने पुन्हा विचारलाच. त्यावरही भुजबळ म्हणाले, मी सांगितले ना, उत्तर दिले की आता, असे हसत हसत म्हणत त्यांनी तो विषय डावलला. त्या चिठ्ठीतून नेमके काय लिहले होते, हे गुपित गुलदस्त्यातच राहिले.