ब्रेकिंग! अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सीआयडी कार्यालय गाठले

बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर आरोप केले जात आहेत. वाल्मिकला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. वाल्मिक हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून देखील आरोप केले जात आहेत.
दरम्यान, वाल्मिक हे आज सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या. यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक हे सीआयडीच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते, याचा ठावठिकाणा सांगितला.
वाल्मिक यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसार माध्यमांनी घेरले. तुम्ही वाल्मिक कराडांसोबत कुठून आलात, कुठे होतात, असा प्रश्न यापैकी एका व्यक्तीला विचारण्यात आला. यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की, आम्ही आता देवावरुन आलो. आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो.
पण आठ दिवस वाल्मिक कुठे होते, हे माहिती नाही. वाल्मिक मला अक्ककोटच्या मंदिरात भेटले, असे या व्यक्तीने सांगितले. तर या व्यक्तीसोबत असणारा बीडमधील एक नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून वाल्मिक यांच्यासोबत आहे. परवापासून वाल्मिक हे पुण्यातच आहेत, असे या नगरसेवकाने सांगितले. वाल्मिक यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भीती वाटत होती, असे या नगरसेवकाने यावेळी सांगितले.