क्राईम
धनुभाऊंशी पंगा, वाल्मिकशी दंगा

- सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगमधील पोरांना बीडच्या तुरुंगात मारहाण झाल्याचे आज सकाळी समोर आले. बबन गिते याच्या टोळीतील समर्थक कैद्यांकडून वाल्मिक आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याचे वृत्त आहे. देशमुख हत्या प्रकरणात आवाज बनलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनीही मारहाण झाल्याचे म्हटले. या संपूर्ण प्रकरणात गिते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
- देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कराडसह त्याची आठ जणांची गँग बीडच्या तुरुंगात आहे. याच तुरुंगात गिते याचे समर्थक कैदीही आहेत. पूर्वीच्या राजकारणात दोन्ही गँगमध्ये बऱ्याचदा राजकारणावरून चकमकी उडाल्या होत्या. तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांचे मतभेद होते. हेच मतभेद आजच्या वादावादीला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. परंतु गिते एका खून प्रकरणात फरार असूनही त्याच्या समर्थक कैद्यांनी कराडच्या कानशिलात कशी लगावली? असा प्रश्न उपस्थित होत असताना यानिमित्ताने वाल्मिक-गिते यांच्यातील गँगमध्ये भडका उडाल्याचेही सांगितले जाते.
- राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून गितेचे नाव समोर येऊ लागले. गिते यानेही परळीत आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे गितेने ठरवले. विधानसभा निवडणूक लागायला काही महिने शिल्लक असताना सातशे गाड्यांचा ताफा घेऊन प्रवेशासाठी तो मुंबईला आला. एवढ्या गाड्यांचा ताफा आणि त्याच्या मागे असलेली समर्थकांची संख्या पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही डोळे विस्फारले. पवार आणि जयंत पाटील यांनी गितेला बळ देण्याचे ठरवले. मुंडे यांना पर्याय म्हणून त्यांचे चेहरा प्रोजेक्ट करण्याचे राष्ट्रवादी पवार गटाचे नियोजन होते.
- परंतु त्याच काळात मरळवाडीचे सरपंच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बापू आंधळे यांचा खून झाला. भर दिवसा त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यांच्या खुनाचा आरोप बबन गिते यांच्यावर ठेवण्यात आला. बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून बबन गिते अद्याप समोर आलेला नाही, तो फरारच आहे.



