क्राईम
बीडचे नवीन सिंघम एसपी यांचा गुन्हेगारांना खणखणीत इशारा
- वाळू माफिया, गोळीबार, बनावट नोटा, कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारामाऱ्या, खंडणी आणि आता थेट खूनाच्या प्रकारानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल बीडचे तत्कालीन पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची बदली केली आहे. काल रात्री उशीरा नवनीत काँवत नवे पोलिस अधिक्षक म्हणून बीडला रुजू झाले. आज रविवारी पहिल्याच दिवशी त्यांनी कार्यालयात येत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
- काँवत म्हणाले, मी काल रात्री उशीरा हजर झालो. मात्र, पोलिसांना रविवार-सुट्टी वगैरे काही नसते. त्यामुळे आज ऑफिसला आलो. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. चार आरोपी पकडले आहेत. आता उरलेले तीन आरोपी लवकरच जेरबंद होतील. यापुढे दहशत करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा थेट इशारा काँवत यांनी पहिल्याच दिवशी दिला.
- काँवत म्हणाले, बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारीमुक्त करणार आहे. बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या डोक्यात हवा गेली असेल, त्यांनी स्वतःला आवरावे, असा इशाराही त्यांनी दिला.