राजकीय
ब्रेकिंग! सोलापूर दक्षिण जागेवरून जोरदार वाद

- महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचे सांगितले जाते, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगतात. अशातच आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताना दिसत आहे. मात्र सोलापूर दक्षिण जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद झाला होता. यानंतर ठाकरे गटाकडून सोलापूर दक्षिण जागेवर अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने काल आपली चौथी यादी जाहीर करताना त्याच ठिकाणी दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचे म्हटले होते. तसेच नागपूरमध्ये एकच जागा दिल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. यावर आता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, कोकणात आम्हालाही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आता राऊतांनी जागावाटपाचा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे मला असे वाटते की, राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे, असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. दरम्यान, सोलापूर दक्षिणच्या जागेप्रकरणी बोलताना पटोले म्हणाले, आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्या पातळीवर ती चर्चा होईल.



